गुरुवार, ३ जुलै, २०१४

चांगले दिवस येतील.

२०१४ मध्ये लोकसभा निवडणूक झाली; आणिसत्तांतर झाले. लोकशाही मध्ये हे अपेक्षितही असते; आणि असावे. सत्तांतर का होते? जनता सत्ता का बदलतात? याचे साधे कारण म्हणजे सत्तेवर असलेल्या सरकारने जनतेला अपेक्षित असलेली कामे केली नाहीत. जनतेला अपेक्षित असलेला विकास झाला नाही. त्याऐवजी इतर गैर कामे झाली. भ्रष्टाचार, महागाई, गुन्हेगारी इ. वाढले. महिलांवरील अत्त्याचार वाढले. सुरक्षितता राहिली नाही. सरकार याला आळा घालण्यास सक्षम नाही; हे जेव्हा जनतेला दिसून आले; तेव्हा जनतेने त्यांना प्राप्त अधिकाराचा वापर करून निवडणुकीद्वारे सत्तांतर घडवून आणले. एक प्रकारे हे परिपक्व लोकशाहीचे लक्षण आहे.
अनेकांनी याची अनेक कारणे सांगितली; जी त्यांच्या सोईप्रमाणे; आणि त्यांना सोईस्कर अशी होती. पण मुख्य कारण म्हणजे जनता नाराज होती; म्हणून तिने सत्तांतर घडवून आणले हेच खरे. दुसरी बाजू अशीही समोर आली, की एक लाट होती; म्हणून असे झाले. पण वस्तुस्थितीतून विचार केला तर लाटेपेक्षा लोकांना पर्याय हवा होता; आणि तो त्यांना मिळाला म्हणून सत्तांतर झाले. दिल्लीत असेच झाले होते. लोकांना आपचा पर्याय सापडला होता. पण लोकांचा भ्रमनिरास झाला; तेव्हा लगेच त्यांना बाजूला सारले. चांगले दिवस येतील म्हणून लोकसभेत सत्तांतर घडविले. तीस वर्षानंतर पूर्ण बहुमताने सरकार निवडून दिले. आघाडी, युतीमुळे कामे करता येत नाहीत इ. कारणांना जागा ठेवली नाही. तेव्हा आता सरकारची कसोटी आहे, की ते लोकांच्या अपेक्षा कितपत पूर्ण करतात. लोकांना किमान अपेक्षित कामे कितपत होतात. लोकांच्या प्राथमिक, मुलभूत गरजा, अन्न, पाणी, निवारा या पूर्ण होतात किंवा नाही. भ्रष्टाचार, अत्त्याचार, गुन्हेगारी, महागाई याला आळा बसतो की नाही. शिक्षण आणि आरोग्य याची सर्वांसाठी व्यवस्था होते की नाही. किमान इतके झाले तरी लोक समाधानी होतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा