बुधवार, २० जानेवारी, २०१६

साहित्य-नाटक-चित्रपट...

                                                   "नटसम्राट" नाटक - चित्रपट 

     श्रीराम लागू आणि शांता जोग यांच्या अप्पासाहेब बेलवलकर आणि कावेरी या भूमिका असलेले "नटसम्राट" नाटक पाहिले होते. त्यांनी  ज्या पातळीवर नाटक नेऊन ठेवले होते; त्याची बरोबरी अद्याप कोणी केलेली नाही. तसेच वी. वा. शिरवाडकरांच्या लिखाणाची कोणी बरोबरी करू शकणार नाही. त्यांनी "किंग लियर " या इंग्रजी नाटकाचे रुपांतर केलेले नाटक म्हणजेच "नटसम्राट". त्यात एका प्रसिद्ध आणि म्हाताऱ्या नटाची शोकांतिका दर्शविली आहे. त्यात त्यांनी नाटकाचा आणि पत्रांचा दर्जा कोठेही कमी होऊ दिलेला नाही. त्या काळातही नट दारू पीत असले;तरी नाटकात कोठेही असे प्रसंग अथवा संवाद नाहीत. श्रीराम लागू आणि शांता जोग यांची शोकांतिका प्रेक्षकांचे मन हेलावून सोडते; आणि प्रेक्षकांच्या डोळ्यात  अश्रू  दाटून येतात.
     याच नाटकावर बेतलेला चित्रपट "नटसम्राट - असा नट होणे नाही" पाहिला. नाना पाटेकर आणि इतर सर्वांच्या भूमिका चांगल्या झाल्या आहेत. तांत्रिक बाजू चांगली आहे. नाटकातील स्वगते आणि इतर काही प्रसंग कमी केलेत; आणि काही पात्रे, प्रसंग नवीन टाकलेत हे ही ठीक वाटते. ते चित्रपटात करावे लागते हे ही मान्य आहे. परंतु दारूचा अतिरेक केला आहे, ते खटकते. नाना पाटेकरचा मित्र रामा बायको दवाखान्यात कोमात असताना दोघे दारू पिण्यासाठी जातात; तसेच तिचे प्रेत जळत असताना रामा दारू पितो हे खटकते. नाना पाटेकर जांभळाची हातभट्टीची दारू पिऊन पार्टीत जो धिंगाणा घालतो त्या प्रसंगाने असे वाटते की, रामा आणि अप्पा बेलवलकर दारुडे आहेत. नटसम्राटची प्रतिमा डागाळते. हे तीन प्रसंग घेतले नसते तर बरे झाले  असते.
     बदललेल्या काळानुसार नटसम्राटच्या सत्कारानंतर नाना पाटेकर आणि रामा नानाच्या घरी दारू पितात; आणि कावेरीच्या मृत्युनंतर नाना आणि राजा पुलाखाली दारू पितात  एवढे दाखविले असते तर ते समजू शकले असते. कारण जनरली कोणतेही कलाकार दारू पितात हे सर्वज्ञात आहे. म्हणून त्याचा अतिरेक करणे योग्य वाटत नाही. तसेच अशा नटांना कोणता प्रसंग आहे याचेसुद्धा भान राहत नाही; हे पटत नाही.
     शेवटी निर्माता - दिग्दर्शक यांना जसे हवे तसेच ते घेणार! तसेच काही प्रेक्षकांना ते पटेल; तर काहींना पटणार नाही. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. परंतु मला जे वाटले ते लिहिले.

      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा