शनिवार, १६ डिसेंबर, २०१७

मा. श्री लक्ष्मीकांत देशमुख, अध्यक्ष, ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांची टीवीवरील मुलाखत.

  1.      मा. श्री लक्ष्मीकांत देशमुख, अध्यक्ष, अ. भा. म. सा. स., यांची टीवीवरील मुलाखत.

       मा. श्री लक्ष्मीकांत देशमुख यांची काल टीवीवरील मुलाखत पाहिली. खूप अप्रूप वाटले. परभणी येथे आमचे सर असताना त्यांचा सहवास लाभला. त्यांचा निःस्पृह स्वभाव, कामाप्रती आग्रही वृत्ती, त्यांचे व्यक्तिमत्व, लिखाण इ. बाबींचा अनुभव मिळाला. त्यांची दोन नाटके, "दीपशिखा" आणि "अखेरची रात्र" मध्ये मला भूमिका करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच. 
       सरांना साहित्य क्षेत्राची आवड होती आणि आहे. त्यांच्यामुळेच ६८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन इ. स.  १९९५मध्ये आणि अखिल भारतीय मराठी  नाट्य संमेलन इ. स. २००० मध्ये परभणी येथे होऊ शकले. परभणीसारख्या अविकसित जिल्ह्याच्याठिकाणी ही संमेलने होऊ शकली; ती सरांमुळेच. या दोन्ही संमेलनाला अभूतपूर्व गर्दी झाली होती. साहित्यप्रेमी आणि प्रेक्षक यांनी मंडप हाऊसफुल्ल झाल्यामुळे मंडपाच्या बाहेर उभेराहून संमेलनांचा आनंद घेतला होता. पुस्तकांच्या स्टाँलवर पुस्तकांची  विक्रमी विक्री झाली होती.
       सरांचे दुसरे महत्वाचे कार्य म्हणजे, परभणीचे सुपुत्र आणि प्रख्यात साहित्यिक आणि कवी बी. रघुनाथ यांचे स्मारक अस्तित्वात आले. बी. रघुनाथ सभागृह/नाट्यगृह, साहित्य प्रदर्शनासाठी हॉल आणि बी. रघुनाथ यांचा देखणा पुतळा सरांमुळेच उभा राहू शकला. सरांचे हे कार्य परभणीकर कधीच विसरू शकणार नाहीत.
       ९१व्या अ. भा. म. सा. सं. चे अध्यक्ष म्हणून सरांचे कार्य अलौकिक राहणार यात शंका नाही. मला साहित्याचा थोडा अनुभव आल्यानंतर आणि माझी तीन पुस्तके; १]" जीवन संघर्ष" {आत्मचरित्र},  [२] "भूलई" { कथा संग्रह} आणि [३] "आठवणींचा पिंगा" { व्यक्तिचित्रें आणि कथा संग्रह} प्रकाशित झाल्यानंतर असे वाटते, कीं;  सरांच्या मुलाखतीत उल्लेख झाल्याप्रमाणे खालीलप्रमाणे गोष्टी व्हाव्यात.
       १] मतदारांची संख्या वाढावी. त्यासाठी साहित्य परिषदेने मतदार नोंदणीसाठी पेपरमध्ये जाहिरात द्यावी. मतदार होण्यासाठीच्या अटीं नमूद कराव्यात; तसेच फी अत्यल्प ठेवावी.
       २] सरांनी म्हटल्याप्रमाणे, बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी मराठी विषय आवश्यक करावा; म्हणजे मराठी भाषेचे महत्व वाढेल.  सध्या पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे कल जास्त आहे; तो कमी होऊन मराठीकडे वाढवा ही अपेक्षा. मराठी माध्यमातून शिकलेले विद्यार्थीसुद्धा डॉक्टर, इंजिनिअर आणि महत्वाच्या पदावर जाऊ शकतात; हे पालकांनी  ध्यानी घ्यावे. शिवाय प्रत्येक मराठी माणसाने लक्षपूर्वक मराठीतूनच बोलावे आणि लिहावे. मराठी भाषेची भेसळ करू नये.
       ३] महत्वाचे म्हणजे, इतर भाषेतील साहित्यापेक्षा मराठी साहित्याच्या किमती भरमसाठ आहेत. सामान्य माणसाला असे साहित्य विकत घेणे इच्छाअसूनही परवडत नाही. इंग्रजी, हिंदी साहित्याच्या किमती कमी असतात; त्याप्रमाणेच मराठी साहित्याच्या किमती कमी झाल्यातर आपसूकच मराठी वाचकही वाढतील आणि मराठीला बरे दिवस येतील.
       लक्ष्मीकांत देशमुख सरांनी त्यांच्या मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे ते अनेक कामे करतील यात काही शंका नाही. त्यांनी सनदी अधिकारी म्हणून काम केलेले असल्यामुळे त्यांचा शासनदरबारी चांगला वट आहे; त्यामुळे अद्याप न झालेली कामेही होऊ शकतील.
       शेवटी, सर अध्यक्षपदी निवडून आले म्हणून त्यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीस मनःपूर्वक अनेक अनेक शुभेच्छा.
                                                                   ...
      

शनिवार, ९ सप्टेंबर, २०१७

नटसम्राट नाटक आणि चित्रपट...

नटसम्राट चित्रपट पाहिला. पूर्वी हेच नाटक पाहिलेले आहे. श्रीराम लागू आणि शांता जोग यांनी हे नाटक

बुधवार, २० जानेवारी, २०१६

साहित्य-नाटक-चित्रपट...

                                                   "नटसम्राट" नाटक - चित्रपट 

     श्रीराम लागू आणि शांता जोग यांच्या अप्पासाहेब बेलवलकर आणि कावेरी या भूमिका असलेले "नटसम्राट" नाटक पाहिले होते. त्यांनी  ज्या पातळीवर नाटक नेऊन ठेवले होते; त्याची बरोबरी अद्याप कोणी केलेली नाही. तसेच वी. वा. शिरवाडकरांच्या लिखाणाची कोणी बरोबरी करू शकणार नाही. त्यांनी "किंग लियर " या इंग्रजी नाटकाचे रुपांतर केलेले नाटक म्हणजेच "नटसम्राट". त्यात एका प्रसिद्ध आणि म्हाताऱ्या नटाची शोकांतिका दर्शविली आहे. त्यात त्यांनी नाटकाचा आणि पत्रांचा दर्जा कोठेही कमी होऊ दिलेला नाही. त्या काळातही नट दारू पीत असले;तरी नाटकात कोठेही असे प्रसंग अथवा संवाद नाहीत. श्रीराम लागू आणि शांता जोग यांची शोकांतिका प्रेक्षकांचे मन हेलावून सोडते; आणि प्रेक्षकांच्या डोळ्यात  अश्रू  दाटून येतात.
     याच नाटकावर बेतलेला चित्रपट "नटसम्राट - असा नट होणे नाही" पाहिला. नाना पाटेकर आणि इतर सर्वांच्या भूमिका चांगल्या झाल्या आहेत. तांत्रिक बाजू चांगली आहे. नाटकातील स्वगते आणि इतर काही प्रसंग कमी केलेत; आणि काही पात्रे, प्रसंग नवीन टाकलेत हे ही ठीक वाटते. ते चित्रपटात करावे लागते हे ही मान्य आहे. परंतु दारूचा अतिरेक केला आहे, ते खटकते. नाना पाटेकरचा मित्र रामा बायको दवाखान्यात कोमात असताना दोघे दारू पिण्यासाठी जातात; तसेच तिचे प्रेत जळत असताना रामा दारू पितो हे खटकते. नाना पाटेकर जांभळाची हातभट्टीची दारू पिऊन पार्टीत जो धिंगाणा घालतो त्या प्रसंगाने असे वाटते की, रामा आणि अप्पा बेलवलकर दारुडे आहेत. नटसम्राटची प्रतिमा डागाळते. हे तीन प्रसंग घेतले नसते तर बरे झाले  असते.
     बदललेल्या काळानुसार नटसम्राटच्या सत्कारानंतर नाना पाटेकर आणि रामा नानाच्या घरी दारू पितात; आणि कावेरीच्या मृत्युनंतर नाना आणि राजा पुलाखाली दारू पितात  एवढे दाखविले असते तर ते समजू शकले असते. कारण जनरली कोणतेही कलाकार दारू पितात हे सर्वज्ञात आहे. म्हणून त्याचा अतिरेक करणे योग्य वाटत नाही. तसेच अशा नटांना कोणता प्रसंग आहे याचेसुद्धा भान राहत नाही; हे पटत नाही.
     शेवटी निर्माता - दिग्दर्शक यांना जसे हवे तसेच ते घेणार! तसेच काही प्रेक्षकांना ते पटेल; तर काहींना पटणार नाही. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. परंतु मला जे वाटले ते लिहिले.

      

सोमवार, ६ एप्रिल, २०१५

सामाजिक : अभिनय

सामाजिक : अभिनय: अभिनय म्हणजे काय? तो शिकावा लागतो का? नाटकात, सिनेमात अभिनय कसा करतात? या विषयी सर्वांना उत्सुकता असते. नट नट्यांचा अभिनय पाहून प्रेक्षकांन...

मंगळवार, १७ मार्च, २०१५

अभिनय

अभिनय म्हणजे काय? तो शिकावा लागतो का? नाटकात, सिनेमात अभिनय कसा करतात? या विषयी सर्वांना उत्सुकता असते. नट नट्यांचा अभिनय पाहून प्रेक्षकांना आश्चर्य वाटत असते; पण वस्तुस्थितीतून विचार केला, तर अभिनय प्रत्येकाला निसर्गप्राप्त देणगी आहे. मूल जन्माला येताच रडते ते अभिनयासह. त्याला रडण्याचा अभिनय कोणी शिकवलेला नसतो. पुढे चालून ते हसते, चिडते, रागावते, मारते, आयुष्यभर प्रत्येकक्षणी अभिनय करीतच जगते. विशेष म्हणजे हा निसर्गप्राप्त अभिनय स्वाभाविक; आणि परिणामकारक असतो. असे असताना अभिनय करण्याची वेळ आल्यावर तो करणे अवघड का वाटते? प्रत्येकाला तोच अभिनय स्टेजवर करणे का जमत नाही? अभिनयाचे वेगळे प्रशिक्षण का घ्यावे लागते? बरे, असे प्रशिक्षण घेऊनसुद्धा प्रत्येकाला तो करता येतो असेही नाही. असे का; याचे उत्तर म्हणजे; प्रत्येकाला अभिनयाची उपजत देणगी असली; तरी त्याचीच नक्कल करणे जमत नाही. अस्सल अभिनयाची अस्सल नक्कल करणे अवघड जाते. जो उपजत अभिनयाची अस्सल नक्कल करू शकतो, तोच खरा/खरी , नट/नटी म्हणविल्या जाते; आणि तीच प्रसिद्ध पावते.
     पूर्वीच्या काळी रंगभूमीवर जी संगीत नाटके केली जात; त्यावेळी नटांना नकलाकार म्हणत असत; ते याच कारणाने.

शनिवार, १३ डिसेंबर, २०१४

खेळ

 दृश्य १ :

खेळ चालू आहे... . बघ्यांची गर्दी... घोषणाबाजी,,, बहिष्कार... निवेदने... प्रतीनिवेदने... खुलासे...असे म्हटलेच नाही... म्हणण्याचा विपर्यास केला... उद्देश तसा नव्हता... भावना दुखावल्या असतील तर; शब्द मागे... माफी... प्रकरण संपले...

दृश्य २:

दुष्काळ... पाणी नाही... पिके गेली... कर्ज झाले... आत्महत्त्या... खून... बलात्कार... अत्त्याचार.. मोर्चे...

दृश्य ३:

खेळ चालू आहे...


शनिवार, ५ जुलै, २०१४

महागाई

महागाई म्हणजे काय? मी फार पूर्वीपासून वडीलधारयांकडून महागाई वाढली, आजकाल किती महागाई वाढलीय असे ऐकत आलोय.  आमच्या काळात ईतकी महागाई नव्हती. किती स्वस्ताई  होती. पैशाला पायलीभर ज्वारी मिळत होती. एक आण्यात थैलीभर सामान यायचे. पांच-दहा रुपयात महिन्याचे किराणा सामान व्हायचे. सोने ५०-६०  रुपये तोळा होते. आता काय जमाना आलाय! पोतंभर पैसे नेले; तर पिशवीभर सामान येते. कलयुग दुसरे काय?
आतातर महागाई आकाशाला भिड्लीय. शंभर रुपयात पिशवीभर भाजी सुद्धा येत नाही. सर्व वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत. लांब कशाला, १९६०-१९६२मध्ये १००-१२५ रुपयात एका कुटुंबाचे घर चालायचे. त्याकाळी कारकुनाला १०० रु. पगार होता; पण तेवढ्यात घर चालायचे. पुरुष मजुरांना ५ रु. आणि स्त्री मजुराला ३ रु. रोजची मजुरी मिळायची. तेवढ्यात त्यांचा संसार व्यवस्थित चालत असे. मग ही महागाई आली कोठून? कशी वाढली?
पूर्वीच्या ५०-६०  रु. तोळा सोन्याच्या काळात विकास नावाची गोष्टच नव्हती. खेड्या-पाड्यापर्यंत पक्के रस्ते, वीज, शाळा, टीव्ही सोडा; पण फोन, रेडीओ सुद्धा नव्हते. पिठाची गिरणी, पाण्याचे नळ नव्हते. सिनेमे, हॉटेली नव्हत्या. लोकांच्या गरजा अगदी कमी होत्या. मुख्य गरजा म्हणजे खाणे, कपडा, पायताण अशाच होत्या.त्या जवळच्या बाजारपेठ असलेल्या गावातून भागविल्या जायच्या. दाळ दाना , धान्य इ. शेतात पिकविले जायचे. शेतकरी शेतात पिकलेल्या धान्यातूनच काही धान्य बियाणे म्हणून पुढच्या वर्षासाठी ठेवायचा. जनावरांचे शेण, उकीरड्यावरील कचरा हेच खत म्हणून शेतात टाकायचा. रासायनिक खत नाही, की कीडनाशके नाही. म्हणजेच शेंद्रीय पद्धतीने शेतीत पिके घेतली जायची. त्यामुळे खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असायचे. जनावरांमुळे दूधदुभते भरपूर असायचे. खाऊन पिऊन माणसे सुखी असायची.
काळ बदलला. विकास होत गेला. सुधारणा झाल्या. पक्के रस्ते झाले, वीज आली, शाळा झाल्या, धरणे झाली, कालवे झाले, नळ आले, विहिरीवर मोटारी आल्या , रासायनिक खते आली, सुधारित बियाणे आले, कीडनाशक औषधे आली, रेडीओ, टीव्ही, फोन, मोबाईल, सिनेमे, हॉटेली, बार्स उघडले, गावाला, तालुका, जिल्हा कोठेही जाण्यासाठी वाहने, बस, खाजगी वाहतूक जीप, कार सर्व आले. चंगळवादी साधनांची भरमार झाली. बाजारपेठा वाढल्या, उद्योगधंदे वाढले. राहणीमान वाढले. फॅशन्स वाढल्या. प्रसाधने वाढली. खर्च वाढले. शिक्षणाचे प्रमाण वाढले. डॉक्टर, इंजिनीअर सर्व क्षेत्रात आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध झाले. शहरे वाढली. जग जवळ आले. आंतरराष्ट्रीय संबंध वाढले. आयात निर्यात वाढली. आंतरराष्ट्रीय किमतीनुसार दर वाढू लागले. गरजा वाढल्यामुळे मागणी वाढली. मागणी वाढत गेली; तशा किमती वाढू लागल्या. किमती वाढू लागल्या तसे उत्पन्न वाढू लागले. पगारदारांचे पगार १०० रु. हून  १० हजार रु. झाले, मजुरी ५ रु. वरून २५०-३०० रु. झाली. रिक्षा भाडे ५-१० रु. वरून ५०-६० रु. झाले. भाजी ४-५ रु. वरून १५-२० रु. झाली. थोडक्यात  जशा गरजा वाढल्या, मागणी वाढली; तशा किमती वाढल्या;  त्यामुळे महागाई वाढली; आणि म्हणून उत्पन्न वाढले.
याचा दुसरा अर्थ महागाई वाढत नाही; तर जशी मागणी वाढते तशा किमती वाढतात; आणि किमती वाढतात तसे उत्पन्न वाढते. हे एक प्रकारचे चक्रच आहे.
दुसऱ्या देशात युद्ध सुरु झाले, की तेलाच्या किमती वाढतात. त्या प्रमाणात आपल्याकडेही त्या वाढवाव्या लागतात. कांदा निर्यात झाला, की देशात त्याचा भाव वाढतो. निर्यात बंदी केली, की भाव पडतो, कांदा सडतो, फेकून द्यावा लागतो. मग आंदोलने, संप सुरु होतात. जवळ जवळ प्रत्येक क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात असेच चालते. मग "अच्छे दिन आयेंगे " म्हटलं तरी दर वाढवावे लागतात. हा कडू औषधाचा डोस समजायचा; दुसरे काय? जनता विष पचवते: तेथे कडू औषध पचविणारच. पण कडू औषध देणाराने " अच्छे दिन " लवकरात लवकर कसे आणता येतील ते पाहावे. त्यासाठी भ्रष्टाचार संपविणे महत्वाचे आहे. कायदे कडक करून त्याची अंमलबजावणी सुद्धा तितकीच कडक झाली पाहिजे. जनता आशेवर जगत आहे. या आशा पूर्ण करील  अशी व्यक्ती समोर आल्यामुळे जनतेने त्या व्यक्तीची " दिल मांगे मोर" ही इच्छा पूर्ण केली. आता जनतेचे स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची आहे. जनता " अच्छे दिन " कडे डोळे लाऊन बसली आहे...