सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

स्वप्ने

प्रत्येकजण स्वप्ने पाहत असतो. झोपी गेल्यावर आणि जागेपणी सुद्धा. स्वप्ने अनेक प्रकारची असतात. सुखाची - दुखाःची .. , स्वतःसंबंधी, ईतरासंबंधी. गाव, शहर, देश, राजकारण अशा अनेक विषयाची. अशी काही स्वप्ने असतात, की ती इतरांना सांगावीशी वाटतात. सांगता नाही आली; तर लिहून काढावीशी वाटतात; पण सांगण्यासाठी ऐकणारे भेटावयास पाहिजेत. तेही स्वप्ने समजून घेणारे, आपल्या भावना समजणारे. पण असे होत नाही. आपण सांगितले तर एकतर ते हसण्यावारी नेतात; किंवा त्याकडे दुर्लक्ष तरी करतात. मग आपला विरस होतो. आपण स्वप्ने का पाहतो हाच प्रश्न पडतो. आपल्याला स्वप्ने का दिसतात असेही वाटते; पण दिसणे किंवा पाहणे आपल्या हातात नसते. ते केव्हाही दिसतात आणि ते दिसले, की पाहावेच लागतात. मग  ते मनात सलत राहतात, डाचत राहतात. त्यांचा निचरा होईपर्यंत शांतता लाभत नाही. त्यांचा निचरा करण्यासाठी मार्ग सुचत नाही. मग रात्ररात्रभर झोप येत नाही. सारखा तोच विचार. शेवटी असा विचार आला, की ते लिहून काढावीत. कोणी वाचो, ना वाचो. त्याचा परिणाम होओ न होओ. आपण लिहित राहायचे; आणि मग मन शांत झाले.
     हे एक स्वप्न पडले, ते लिहिले आहे. स्वप्न तसे लहान आहे, साधेच आहे. पुढे पाहू आणखी कशी  स्वप्ने दिसतात...